Shirol Herwad Gram Panchayat
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीतील दप्तर गायब होऊन पुन्हा कार्यालयात जमा झाल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. गायब झालेल्या फाईलमध्ये दोन लोकप्रतिनिधींनी दीपावलीत कर्मचाऱ्यांसाठी कपडे खरेदी करताना स्वतःसाठी सुमारे सहा हजार रुपयांचे कपडे घेतल्याच्या व्हाऊचर तर गावातील काही ग्रामस्थांना ठेकेदार दाखवून त्यांच्या नावे विविध विकासकामांची बिले काढून पैसे घेतल्याच्या व्हाऊचरचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
हे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच हे दप्तर गायब करण्यात आल्याची चर्चा सध्या गावात रंगली आहे. आता परवानगीशिवाय दप्तर गायब करण्याच्या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन गुन्हा दाखल करून कारवाई करणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी संजय पुकाळे यांनी सांगितले आहे.
संबंधित फाईल परत आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडे ही फाईल नेमकी कोणाकडून आली, याचा उलगडा मंगळवारच्या होणाऱ्या जबाबतून संबंधित लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश होणार आहे.
चोरीला गेलेले दप्तर 9 तारखेला पुन्हा ग्रामपंचायतीत जमा झाले असून, सध्या ते ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे यांच्या कस्टडीत आहे.या दप्तर मधील दीपावली कपडे खरेदी, ग्रामस्थांच्या नावे काढण्यात आलेल्या बिलांची दस्तऐवज आहेत की? ती गायब झाली आहेत याची माहिती ग्राम विकास अधिकारी पुकाळे यांनी द्यावी, या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
सोशल मीडियावर उघड झालेले दस्तऐवज आणि दप्तर गायब प्रकरणामुळे संशयाचे सावट गडद
दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ग्रामपंचायतीतील काही कागदपत्रे व व्यवहारांचे पुरावे प्रसारित झाले होते. त्यामध्ये गावातील काही ग्रामस्थांना ठेकेदार दाखवून बिले काढल्याचे दस्तऐवज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सध्या समोर आलेले दप्तर गायब प्रकरण अधिकच संशयास्पद मानले जात आहे.