शिरढोण : हेरवाड (ता. शिरोळ) येथे डेंग्यूसदृश्य आजाराचे ४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गावातील तुंबलेल्या गटारी, जागोजागी साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची चर्चा आहे. ताप, अंगदुखी यांसह डेंग्यूसदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर सांगली, दत्तवाड तसेच आयजीएम रुग्णालय, इचलकरंजी येथे उपचार सुरू आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्याच्या तक्रारींची दखल घेत आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीकडून विविध भागांत धूर फवारणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत असून, प्रत्येक घरात मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराभोवती पाणी साचू न देणे, पाणीसाठे झाकून ठेवणे आणि आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘कोरडा दिवस’ पाळा; डासांची उत्पत्ती रोखा
डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. घराभोवती पाणी साचू देऊ नये. पाण्याची भांडी झाकून ठेवावीत. आठवड्यातून एकदा घरातील व परिसरातील पाणीसाठे रिकामे करून स्वच्छ करावेत. ताप, अंगदुखी किंवा अन्य लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.