एका व्यक्तीने शासकीय फंडातून होणारा रस्ता अडविला आहे. Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Encroachment | नागावच्या ‘आपट्याच्या माळा’ला अतिक्रमणाचा विळखा; ‘सोनं लुटण्याचा’ पारंपरिक माळच लुटला!

शासकीय मोजणी करून अतिक्रमणे हटवावीत; रस्ता अडविणाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Hatkanangale Nagao Encroachment

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव गावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या ‘आपट्याच्या माळा’वर अतिक्रमणाचा विळखा पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी विजयादशमीला (दसरा) संपूर्ण गाव एकत्र येऊन याच ठिकाणी आपट्याची पाने म्हणजेच ‘सोनं लुटण्याचा’ पारंपरिक सोहळा साजरा केला जातो. मात्र, कचरा डेपोमुळे झालेली दुरवस्था आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे या ऐतिहासिक माळाचे अस्तित्व धोक्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

‘ज्या माळावर दरवर्षी सोनं लुटलं जातं, तोच माळ आता अतिक्रमणांनी लुटला आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

गायरान जमिनीचे अस्तित्व धोक्यात

नागाव येथील ‘आपट्याचा माळ’ ही गायरान जमीन सार्वजनिक तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रशासकीय दुर्लक्षामुळे काही व्यक्तींनी या जमिनीवर अतिक्रमणे केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे मोकळ्या सार्वजनिक जागेचे क्षेत्रफळ कमी होत असून पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्यासाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

  • तातडीने शासकीय मोजणी : महसूल विभागाने आपट्याच्या माळाची शासकीय मोजणी करून गायरान जमिनीची अधिकृत हद्द निश्चित करावी.

  • अतिक्रमणे हटवावीत : माळावरील बेकायदेशीर अतिक्रमणांची चौकशी करून ती तातडीने हटवावीत आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करावी.

  • गरजू कुटुंबांना नियमानुसार जागा : अतिक्रमणे हटवल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गायरान जमिनीचा नियमानुसार गावातील खरोखर बेघर व गरजू कुटुंबांसाठी उपयोग करावा.

  • पारंपरिक रस्ता मोकळा करावा : अनेक वर्षांपासून वहिवाटीत असलेल्या पारंपरिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी.

विकासकामांना अडथळा आणल्याचा आरोप

सार्वजनिक वापरातील रस्त्यावर काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अडथळ्यांमुळे गावातील शासकीय विकासकामे आणि त्यासाठी उपलब्ध होणारा निधी प्रलंबित राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून प्रस्तावित सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या रस्त्याचा प्रश्नही याच पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. दक्षिणवाडी टोपला जोडणाऱ्या या रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, सार्वजनिक हिताच्या विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा

‘आपट्याचा माळ’ ही नागावची सांस्कृतिक ओळख असून, या जागेवरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा. तसेच विकासकामांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आता महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणी शासकीय मोजणी, अतिक्रमणांची चौकशी आणि रस्त्याच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे नागाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT