

चंदगड : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन या गुरुवारी (दि. २७) चंदगड दौऱ्यावर होत्या. यादरम्यान कळसगादे येथे डॉ. जास्मिन व आमदार शिवाजी पाटील हे वाहनातून पुढे गेल्यानंतर डॉ. जास्मिन यांचे शासकीय वाहन, आमदार शिवाजी पाटील यांच्या शासकीय सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वाहन तसेच लक्ष्मण गावडे (रा. जांबरे) यांचे वाहन अशी तीन वाहने रस्त्यात रोखून धरल्याची घटना घडली.
याप्रकरणी कळसगादे मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दौलत मारुती दळवी, शिवाजी गोपाळ सुतार, गणपत गुंडू सुतार आणि मनोहर तुकाराम दळवी (सर्व रा. कळसगादे, ता. चंदगड) यांच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुनिल सुतार यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या भेटीचा दौरा सुरू होता.
डॉ. जास्मिन व आमदार शिवाजी पाटील हे बसलेले वाहन पुढे निघून गेल्यानंतर वरील संशयित आरोपींनी डॉ. जास्मिन यांचे शासकीय वाहन, आमदारांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे शासकीय वाहन तसेच लक्ष्मण गावडे (रा. जांबरे) यांचे वाहन अडवले. यावेळी, "आमच्या कळसगादे गावातील शाळेला भेट देणे नियोजित असताना तुम्ही भेट न देता पुढे का जात आहात?" असा जाब विचारत संबंधितांशी हुज्जत घालण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.