Prakash Abitkar Shahu Maharaj meeting
कोल्हापूर : राज्याचे अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची आज (दि.१९) सदिच्छा भेट घेतली. ही भेट कोणत्याही राजकीय हेतूने नव्हती, तर आगामी केंद्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी आणि कोल्हापूरच्या विविध विकासकामांना केंद्र सरकारकडून अधिक बळ मिळावे, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या बैठकीत बाळ पाटणकर आणि नाबार्डचे अध्यक्ष यशवंत थोरात हे देखील उपस्थित होते. सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. शाहू महाराज हे सर्वांचे मार्गदर्शक असल्याचे सांगत, "त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी मी आलो आहे," असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. या भेटीद्वारे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्व स्तरांवर समन्वय साधण्याचा निर्णय यावेळी घेण्य़ात आला.
राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मराठी भाषा आणि इतर भाषांच्या सक्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठीच्या प्रश्नावर सरकारने नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. कॅगने केलेले आरोप आणि इतर आरोप वेगळे आहेत. आर्थिक कामकाजातील अनियमितता दुरुस्त करण्यासाठी कॅगचा अहवाल सरकारला सुधारण्याची संधी देतो. हे आरोप केवळ मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर नाहीत, तर सरकारमध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी हे अहवाल उपयुक्त ठरतात. ज्या सूचना मिळतील त्या शंभूराज देसाई नक्कीच अंमलात आणतील, असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.
हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, राजकारणींनी आरोप करताना भान ठेवणे गरजेचे आहे. गरज नसताना अनेक जण या प्रकरणात बोलत आहेत, त्यामुळे कोणाचीही प्रतिमा मलीन होऊ नये, याची काळजी घ्यावी. विरोधकांनीही जबाबदारीने वागावे, असे त्यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांशी संवाद साधल्याशिवाय कोणतीही गडबड करू नये, असे आम्ही यापूर्वीही सांगितले आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत, असे आबिटकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. विरोधकांकडून आरोप होत असले तरी, या सरकारने महाराष्ट्रासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे हे विरोधकांचे कामच आहे, असे आबिटकर यांनी सांगितले.