गोरंबेचा जंगली महाराज आश्रम झाला निस्तब्ध file photo
कोल्हापूर

Kolhapur News | गोरंबेचा जंगली महाराज आश्रम झाला निस्तब्ध

मोहन कारंडे
मधुकर भोसले

हमीदवाडा : फक्त 38 वर्षीय गुरू व त्यांच्या पाठोपाठ अवघ्या महिन्यात 19 व 25 वर्षांच्या दोन तरुण शिष्यांच्यादेखील मृत्यूने, गोरंबे (ता. कागल) येथील सद्गुरू जंगली महाराज आश्रम अबोल-निस्तब्ध झाला आहे. आंबा घाटातील खोल दरीमध्ये या दोन युवा साधकांनी आत्महत्या केल्याने या मठाशी संबंधित भक्तगण या तीन घटनांनी खूप हळहळत आहेत.

निढोरी-कागल या वर्दळीच्या मार्गावर गोरंबे हद्दीमध्ये बुजवडे डोंगर येथे हा आश्रम (आत्मा मलिक ध्यानपीठ) आहे. सद्गुरू जंगली महाराज आश्रमाचे प. पू. धर्मानंदबाबा यांचे वळिवडे येथून या निर्जन डोंगरात 2003 मध्ये आगमन झाले. तिथे एक झोपडी बांधून त्यांनी आश्रमाचे काम सुरू केले. पुढे गोरंबे येथील बुजवडे परिवाराने येथील जागा या मठाला दान केली व त्यानंतर येथील एका साध्या झोपडीचे रूपांतर आश्रमात झाले. अगदी शांत, प्रसन्न व निसर्गरम्य आश्रमाची उभारणी झाली. या भक्ती परंपरेत आत्मा प्रमाण मानून ध्यानाला मोठे महत्त्व असते; त्यामुळे येथे आश्रम म्हणजे ध्यानपीठ विकसित झाले. येथे धानासाठी स्वतंत्र पिरॅमिडदेखील उभारले आहे.

2018 मध्ये धर्मानंदबाबा यांचे निर्वाण झाले व उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या सोबतच सुरुवातीपासून इथे आलेले सागर तथा अमृतानंद महाराज यांच्याकडे या आश्रमाची जबाबदारी आली. साधना, तप, ध्यान, अभ्यास व उत्तम प्रवचन यामुळे व मृदू स्वभावाने त्यांनी हा मठ खूपच लोकाभिमुख केला. अनेक मंदिरांचे कलश त्यांनी स्थापित केले. 6 वर्षांत त्यांनी ध्यान, संगीत विद्यालय, संगीत कार्यशाळा, भजन स्पर्धा, मुद्रा मेडिटेशन अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लोक जोडले. आपली एक स्वतंत्र नियमांची भक्ती परंपरा असतानादेखील त्यांनी त्याचा माणसे जोडण्यात कधीच अडसर येऊ दिला नाही. लोकांच्या समस्येवर गंडा दोरा, कर्मकांड नव्हे, तर संत साहित्याच्या मार्गाने ते मार्गदर्शन करीत.

आशा होती; पण...

स्वतः एरोनॉटिक इंजिनिअर असलेले अमृतानंद महाराज यांना अगदी अल्पशा व्याधीने गेल्या 13 जुलै रोजी अवघ्या 38 व्या वर्षी मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे या मठाशी संबंधित सारेच भाविक हादरून गेले. याच महाराजांच्या सान्निध्यात राहून गेली तीन ते चार वर्षे साधना करणारे स्वरूप दिनकर माने व सुशांत श्रीरंग सातवेकर हे सावलीप्रमाणे गुरूंच्या सोबत असायचे व गुरूंनीदेखील त्यांच्यावर निर्व्याज्य प्रेम केले होते. गुरूंच्या आकस्मिक मृत्यूनंतर स्वरूप व सुशांत यांना विरहाने कमालीचे अस्वस्थ केले होते. त्यांनी घेतलेल्या आध्यात्मिक ज्ञानापेक्षा त्यांच्यातील विरह अधिक सरस ठरला व त्यातूनच त्यांनी थेट आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दोनच दिवसांपूर्वी त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. गुरुदेवांच्या नंतर या दोघांकडून भाविकांना आशा होती. त्यांचे वर्तन खूप नम— व मृदू होते. त्यामुळे ही परंपरा ते चालवतील, असे वाटत असताना त्यांच्या टोकाच्या निर्णयाने चैतन्यमय असणारा आश्रम आता मात्र निस्तब्ध, अबोल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT