Gokul Milk Union Politics
आशिष ल.पाटील
गुडाळ : गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारपासून (दि. 26) सुरू होत आहे. कट ऑफ डेट मधील गोकुळच्या सर्व 5470 संस्थांना आजपासून 1 जुनपर्यंत टप्प्याटप्प्याने ठरावाच्या प्रति पाठविण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, अवसायनाची प्रक्रिया सुरू असलेल्या 1320 संस्था पैकी 1050 संस्थांचा मतदार यादीच्या कट ऑफ डेट मध्ये समावेश आहे. या संस्थांनाही ठराव प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल. मात्र, दरम्यानच्या काळात होणाऱ्या सुनावणीच्या निकालात यापैकी ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल, त्या संस्था कच्च्या प्रारूप यादीतूनच सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (दुग्ध)पुणे यांच्याकडून वगळल्या जातील.
31 जानेवारी 2026 अखेर गोकुळ ला 5981 एवढ्या संस्था सभासद आहेत. मात्र 4 मे 2023 च्या कट ऑफ डेट मध्ये त्यापैकी 5470 संस्थांचाच समावेश राहील .
अवसायनातील संस्थांच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश होते. त्यामुळे या वादग्रस्त संस्थांना ठराव प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, असे सांगण्यात येते.
त्याशिवाय मतदार यादी कार्यक्रम म्हणजे निवडणूक प्रक्रिया नाही. यापूर्वी मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर चार-सहा महिन्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्याकडून निवडणुकीची अधिसूचना काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणे हा मुख्य निवडणूक कार्यक्रम समजला जातो. त्यामुळेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही असे सांगण्यात आले.
तथापि, वडकशिवाले येथील दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्याच्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तसे झाले तर न्यायालयीन प्रक्रियेच्या निर्णयावरच मतदार यादीच्या कार्यक्रमाचेही भवितव्य अवलंबून राहील.