

आशिष ल. पाटील
गुडाळ : महायुतीच्या 19 मे रोजी मुंबईत समन्वय समिती बैठकीत गोकुळमधील घडामोडींसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय ठरला. जागावाटपावर साधक-बाधक चर्चा झाली आणि त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यास हिरवा कंदील दाखवला.
या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत आदींची उपस्थिती होती. दरम्यान, महायुती म्हणून गोकुळच्या निवडणुकीस सामोरे जाताना निवडणूक प्रचारात शासनाने लावलेल्या चौकशीच्या ससेमिर्यांचा अडथळा नको म्हणून या चौकशा गुंडाळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
शुक्रवारी हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्क येथे घेतलेल्या गोकुळच्या माजी संचालकाच्या बैठकीत मुंबईतील झालेल्या निर्णयाबाबत सुतोवाच केले होते. गोकुळच्या आगामी निवडणुकीत निर्वाचित 25 जागांपैकी सर्वाधिक जागा घेऊन भाजप हा मोठा भाऊ ठरेल. त्या खालोखाल जागा इतर मित्र पक्षांना वाटप करण्यात येतील ही बाब राष्ट्रवादी आणि शिवसेना नेतृत्वाने मान्य केली आहे असे समजते. स्वीकृत तीन जागांमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेला झुकते माप देण्यात येईल. यावर एकमत झाले आहे.
प्रशासक नियुक्तीला आव्हान देणार्या याचिका मागे घेण्यात येतील आणि निवडणुका होईपर्यंत प्रशासक मंडळ कायम राहील यावरही बैठकीत एकमत झाले आहे. निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यावर महायुतीच्या घटक पक्षांचे एकमत झाले असले तरी त्यावर न्यायालयीन हरकती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनातील संस्थांचा निर्णय झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाचा संदर्भ घेऊन मतदार यादी कार्यक्रमात अडथळे येऊ शकतात यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. मुख्य निवडणूक कार्यक्रम, अंतिम जागावाटप आणि चेअरमनपदाचे रोटेशन याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.