Ganeshotsav Radhanagari Cases Registered
राशिवडे : राधानगरी तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांसह प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गेल्या तीन वर्षांत तब्बल ६५ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे पुढील कार्यवाहीसाठी राधानगरी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
राधानगरी तालुक्यात २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली. उत्सवाच्या नावाखाली होणारी हुल्लडबाजी, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणे, अशा प्रकारांमुळे पोलिसांनी कारवाईचा कठोर पवित्रा घेतला आहे.
राधानगरी शहरासह राशिवडे, कसबा वाळवे, सरवडे, चांदेकरवाडी तसेच तालुक्यातील अन्य गावांमधील गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या कारवाईमध्ये समावेश आहे. दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे राधानगरी न्यायालयात वर्ग करण्यात आले आहेत.
ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, निर्धारित वेळेचे उल्लंघन, सार्वजनिक शांततेचा भंग, डान्स ग्रुपचे आयोजन तसेच गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी निर्माण होणे, अशा विविध कारणांवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गणेशोत्सव हा शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखून साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा सण आहे, मात्र कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही हयगय न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.- अजित सिंद, पोलीस निरीक्षक, राधानगरी