पुढारी वृत्तसेवा : कवठेगुलंद (ता.शिरोळ) येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव शंकर भगत (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने आज (दि.२७) पहाटे निधन झाले. तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी श्रध्दांजली वाहून कुटुंबियांचे सांत्वन केले.
शामराव भगत हे भारताच्या स्वांतत्र्य चळवळीतील सहभागी असलेली स्वातंत्र्यसैनिक होते. गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. गोवा मुक्ती संग्राम अध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहिले आहेत. भूदान चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. गावातील अनेक सहकारी संस्थांच्या निर्मित त्यांचा पुढाकार होता. गावातील जुन्या प्रथा अंधश्रद्धांना कडाडून विरोध करीत त्यांनी त्या बंद पाडल्या. आपल्या स्वातंत्र्य काळातील किस्से तरुणांना सांगून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले.
सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती. यावेळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, मंडळ आधिकारी संजय सुतार, संतोष पाटील, तलाठी सदाशिव निकम, ग्रामसेवक श्रीकांत जमादार आदीसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा