कोल्हापूर : तमाम फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा असणार्या आगामी फुटबॉल हंगाम अवकाळी पावसामुळे लांबणीवर पडला आहे. दरम्यान, मैदानातील गवत कापणीचे काम पूर्ण झाले असून मुख्य मैदानाची देखभाल-दुरुस्तीची लगबग सध्या छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. यामुळे फुटबॉल हंगामासाठी महिनाअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फुटबॉल हंगामाचा किक ऑफ होण्याची शक्यता आहे.
2025-26 च्या फुटबॉल हंगामासाठीची खेळाडू व संघ नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) दसरा सणानंतर आठवडाभरातच पूर्ण झाली होती. यामुळे यंदाचा फुटबॉल हंगाम दिवाळीचा सण संपताच सुरू होईल, असा तमाम फुटबॉलप्रेमींचा अंदाज होता; मात्र दिवाळीनंतर सुरू झालेल्या पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साठले. तसेच गवत कापणीचे कामही लांबणीवर पडले. त्यानंतरही पावसाची ये-जा सुरू राहिल्याने मैदानाच्या देखभाल-दुरुस्तीसह हंगामाच्या तयारीच्या कामांना सातत्याने व्यत्यय आला. यामुळे मैदानाच्या तयारीचे काम अद्याप सुरूच आहे.
सद्या पाऊस थांबला असला, तरी मैदानात चिखल असल्याने उर्वरित कामांना विलंब लागत आहे. मैदान पूर्णपणे तयार होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागणार आहे. यामुळे हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यापर्यंतचा अवधी लागणार आहे.
प्रेक्षक गॅलरीतील हुल्लडबाजांचा खेळाडूंना होणारा त्रास कमी करण्यासाठी केएसएतर्फे फुटबॉल मैदान स्टेडियमच्या मध्यावर (सेंटरला) घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे मैदान सुमारे 15 मीटर आत जाणार आहे; मात्र पावसामुळे हे कामही रखडले आहे. यामुळे हंगामातील लीग स्पर्धा जुन्याच मैदानावर खेळवावी लागणार आहे.