

शिरोली एमआयडीसी : जोपर्यंत ऊस दराचा निर्णय होत नाही तोवर परिसरातील ऊस कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही म्हणत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिये गावच्या हद्दीत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॅाली अडवली व चालकास कारखान्यास ऊस घेवून जाण्यास मज्जाव केला . ऊस वाहतूक रोखल्याचे समजताच दालमिया कारखान्याने दराची एफआरपी ३६३४.८३ जाहीर केली. पण या जाहीर केलेल्या दराबाबत शेतकरी असंतुष्ट असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शिये (ता. करवीर) येथील मराठी शाळेजवळ शुक्रवारी रात्री शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी आसुर्ले पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्याला घेवून जाणारी ऊसाची वाहतूक रोखली व चालकास ऊस दराबाबत योग्य निर्णय लागत नाही तोवर ऊस वाहतूक थांबवावी अन्यथा होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असणार आहे असा दम दिला. चालकाने कारखान्यास याबाबत कल्पना देताच त्यानी गळीत हंगाम २०२५ / २६ करिता एफआरपी ३६३४.८३ जाहीर केली. पण हा ऊस दर सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या याचिकांच्या अंतिम निर्णयास आदिन राहून देत आहोत असा उल्लेख प्रसिद्ध केलेल्या लेटरमध्ये आहे. या दराबाबत शेतकरी असंतुष्ट असल्याने दराचा योग्य निर्णय होत नाही तोवर आपण गप्प बसणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. माणिक शिंदे यानी सांगितले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे नेतृत्व केलेले उपाध्यक्ष भिकाजी जाधव, सुरेश मानसिंग पाटील, शहाजी पाटील, अशोक पाटील, धनाजी पाटील, अमोल पाटील, महेश फडतारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.