kolhapur flood update
कोल्हापुरात महापुराची भीती वाढत आहे Pudhari news Netwok
कोल्हापूर

kolhapur flood update| कोल्हापूरला महापुराची भीती; स्थलांतर सुरू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे गुरुवारी खुले झाले. धरणातून होणारा विसर्ग, दिवसभर सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पंचगंगेने सकाळी ओलांडलेली धोका पातळी, नागरी वस्तीजवळ येत असलेले पाणी, यामुळे महापुराची भीती वाढत असून, पूरबाधित परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले. दिवसभरात प्रयाग चिखली, कोल्हापूर शहरातील काही भाग, शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यातील चार हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांची पूर पातळी कमी व्हावी म्हणून अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भोगावती नदीचे पाणी धोका पातळीवर गेल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा येथील दगडी पुलावरील वाहतूक गुरुवारी दुपारपासून बंद करण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-गारगोटी मार्गासह 40 हून मार्ग बंद झाले आहेत. 88 बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचा आता संपर्क तुटला आहे.

शहरासह जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर धुवाँधार पावसाचे धूमशान सुरू होते. राधानगरी परिसरात गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीने धरण सकाळी दहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी खुला झाला. त्यापाठोपाठ 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत पाचव्या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचे दरवाजे खुले झाले. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंतही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणाचा पाचवा दरवाजा खुला झाला. सातव्या क्रमांकाचा दरवाजा दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी खुला झाला असून, धरणातून सध्या 8 हजार 640 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. यामुळे भोगावती नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, पंचगंगेच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

वारणा धरणाचा विसर्ग 10 हजार 460 इतका करण्यात आला आहे. कोयना धरणाचेही वक्राकार दरवाजे सायंकाळी उघडण्यात आले आहेत. यामुळे दोन दिवसांत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, पंचगंगेचा महापुराचा धोका कायम राहणार आहे. शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीतही यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेने 43 फूट ही धोका पातळी गाठली. रात्री अकरा वाजेपर्यंत पंचगंगा 43.9 फुटांवर गेली होती. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असल्याने कोल्हापूर शहरासह परिसराला महापुराचा बसलेला विळखा आता घट्ट होत चालला आहे.

धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अद्याप कायम आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील प्रमुख 16 धरण क्षेत्रांपैकी आंबेओहोळ वगळता सर्व धरणांत अतिवृष्टीची नोंद झाली. राधानगरीत 202 मि.मी., तुळशीत 209 मि.मी., तर सर्फनाला येथे 230 मि.मी. पाऊस झाला. जंगमहट्टीत 91 मि.मी. पाऊस झाला. उर्वरित वारणा, दूधगंगा, कासारी, कुंभी, कडवी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा, जांबरे, कोदे या धरण क्षेत्रांत 100 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला.

तीन तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 48.1 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात आजरा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक 85.6 मि.मी. पाऊस आजरा तालुक्यात झाला. राधानगरीत 83.9 मि.मी., भुदरगड 77.8, शाहूवाडी 63, पन्हाळ्यात 61.9 मि.मी. पाऊस झाला आहे.

18 गावांत अतिवृष्टी

राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे 118.5 मि.मी., राधानगरी 118.5, सरवडे 78, आवळी 68.8, कसबा वाळवे 68.8, करवीर तालुक्यातील सांगरूळ 90, आजरा तालुक्यातील गवसे 99, आजरा 99, मलिग्रे 87, पन्हाळा तालुक्यातील कळे 65.5, बाजार भोगाव 92.5, कोतोली 67, भुदरगड तालुक्यातील गारगोटी 73.5, पिंपळगाव 78.8, कडगाव 87.8, करडवाडी 99, शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर 105.8, आंबा 71.3 येथे अतिवृष्टी झाली आहे.

दिवसभर संततधार

शहरात गुरुवारी सकाळी पावसाने उघडीप दिली होती. काही काळ सूर्यदर्शनही होत होते, यामुळे पाऊस थांबेल असे वाटत असताना दुपारी पावसाला सुरुवात झाली. यानंतर मात्र पावसाने थांबण्याचे नावच घेतले नाही. याउलट धुवाँधार बरसला. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 39 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

आज ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 26) ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी (दि. 27) यलो अलर्ट आहे. यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे.

11 राज्य मार्ग, 29 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 160 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला असून, 11 राज्य मार्ग व 29 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 40 मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कूर आणि मडिलगे या दोन ठिकाणी पाणी आल्याने गुरुवारी मार्ग पूर्णतः बंद झाला. तसेच जिल्ह्यात 21 मार्गांवर एस.टी.च्या फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

159 घरांची पडझड

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत दोन सार्वजनिक मालमत्तांचे 1 लाख 70 हजारांचे, तर 179 खासगी मालमत्तांचे 72 लाखांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पाच पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णतः पडझड झाली. पक्क्या 23 घरांची व कच्च्या 136 घरांची अशंतः पडझड झाली आहे. 15 जनावरांच्या गोठ्यांचीदेखील पडझड झाली आहे.

4 हजार नागरिकांचे स्थलांतर

आंबेवाडी-चिखली गावातील सुमारे साडेतीन हजारांवर ग्रामस्थ स्थलांतरित झाले आहेत. दरडप्रवण व भूस्खलन होण्याचा धोका असल्याने आंबर्डे (ता. पन्हाळा) येथील 2 कुटुंबातील 4 पुरुष, 4 स्त्रिया, लहान मुले 8 अशा एकूण 16 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील 500 हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांकडून चिखली, शिरोळ परिसरात पाहणी

दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चिखली, आंबेवाडी, सोनतळी आदी परिसराची पाहणी केली. अजूनही वेळ आहे, लवकर स्थलांतरित व्हा, असे आवाहन करत पाणी पातळी वाढत असताना कोणीही घरात राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. येडगे यांनी चिखलीत जाऊन सुरू असलेल्या स्थलांतराचा आढावा घेतला. यानंतर आंबेवाडीतही त्यांनी काही ग्रामस्थांशी संवाद साधला. चिखलीत सध्या काही तरुण असून, गावातील बहुतांशी नागरिक स्थलांतरित झाले आहेत. सध्या असलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाधिकारी येडगे यांनी शिरोळ तालुक्यातही पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

SCROLL FOR NEXT