हुपरी; पुढारी वृत्तसेवा : 'गोकुळ अष्टमी' निमित्त शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा, हुपरी शहर आणि वंदे मातरम बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, हुपरी यांच्यावतीने १ लाख ५१ हजार रुपये बक्षिसाची भव्य 'लक्ष्य दहीहंडी' सोमवार (दि. ११) सायं. ५ वा. आयोजित करण्यात आली आहे. हिंदू सणांपैकी महत्वाचा असा 'गोकुळ अष्टमी' उत्सव शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुपरी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून हुपरी येथील हुतात्मा स्मारक मैदानावर या मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी दिली.
शिवसेनेच्या यंदाच्या लक्ष्य दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर व माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास माजी आमदार उल्हास पाटील, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर तसेच गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दहीहंडी उत्सवाला जिल्ह्यातील गोविंदाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा :