कोल्हापूर

कोल्हापूर : पिलावरेवाडी येथे भूस्खलन होऊन भात पिकाचे नुकसान

Shambhuraj Pachindre

धामोड : पुढारी वृत्तसेवा : केळोशी बु पैकी पिलावरेवाडी (ता. राधानगरी) येथे भुस्खलन होऊन सुमारे पाच एकरमधील भात शेतीचे मोठे नुकसान झाले. उतारावरील जमीन खचत गेल्यामुळे तीन शेतकरी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले पंधरा दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले, ओढ्याशेजारी असणाऱ्या शेतीला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. ओढ्या नदी काठाची शेती पाण्याच्या प्रवाहाने अक्षरशः खरडून गेली आहे. नदीकाठावरील विद्युत पंपाचेही नुकसान झालेआहे.

पिलावरेवाडी येथील 'घोळ ' नावाच्या शिवारात मोठया प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराचा बहुतांशी भाग खाली सरकला आहे. त्यामुळे येथील चंदर रामा पिलावरे, विलास रामा पिलावरे व प्रकाश भाऊ पिलावरे या शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्‍यांची सुमारे ५ एकर जमीन खचून ओढ्याकडील बाजूला सरकत गेली आहे.खचलेल्या जमिनीचा काही भाग शेजारील शेतकऱ्यांच्या शिवारात धुवून गेल्याने त्यांच्याही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी रणजित पाटील, सरपंच के. एल. पाटील, कृषी सहायक तानाजी परीट, यु. जी. नाधवडेकर, कोतवाल संतोष पाटील, पोलीस पाटील शशिकांत दिघे यांनी  पाहणी करून पंचनामा केला.

 गेल्या वर्षी एका दिवसात या परिसरात ८९५ मिलिमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता. त्यावेळी या परिसरातील माळवाडी, केळोशी, आपटाळ, माळवाडी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. यावर्षी अशाच पद्धतीचे भूस्खलन झाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT