Kolhapur Rain News Canva
कोल्हापूर

Kolhapur Rain News | कोल्हापुरात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; रस्ते जलमय, महाद्वार रोडवरील दुकानात शिरले पाणी

Kolhapur Rain News | कोल्हापूर शहराला आज दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.

shreya kulkarni

Kolhapur Rain News

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला आज दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अवघ्या काही तासांच्या पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. याचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला बसला असून, शहरातील प्रसिद्ध महाद्वार रोडसह अनेक भागांतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

आज सकाळपासूनच कोल्हापुरात ढगाळ वातावरण होते, मात्र दुपारनंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांची अक्षरशः दैना उडवली. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यांवरील पाणी थेट दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली.

महाद्वार रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी यांसारख्या मुख्य बाजारपेठांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. महाद्वार रोडवरील अनेक कापड दुकाने, किराणा दुकाने आणि इतर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

दुकानांमधील माल वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. अचानक आलेल्या या संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असले तरी, पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की, यंत्रणाही हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेचे कर्मचारी पाणी उपसण्याचे काम करत आहेत, मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT