पेठवडगाव : राजकुमार बा. चौगुले
कर्नाटकात शेतकरी रस्त्यावर उतरल्यास मुख्यमंत्री रात्रभर बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात; मात्र महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास पुकारण्यात येणाऱ्या 'कोल्हापूर बंद'मध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने सहभागी होईल, असा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाका येथे सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनस्थळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला.
यावेळी राजू शेट्टी यांची भेट घेऊन पक्षाच्या वतीने आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला. ते म्हणाले डिझेल, खते आणि मशागतीचा खर्च गगनाला भिडला असताना शेतकऱ्यांना हक्काचा दर मिळत नाही. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
साखर कारखान्यांना उपपदार्थांमधून मोठा नफा मिळत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र योग्य मोबदला मिळत नाही, याकडे संजय पवार यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी सुरू केलेला हा लढा न्याय्य असून, त्यांच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आंदोलनातून तोडगा निघाला नाही आणि बंदची हाक दिली गेली, तर व्यापारी आणि नागरिकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे, नगरसेवक सुनील मोदी, तालुकाप्रमुख संदीप दबडे, धनंजय पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.