कोल्हापूर : ज्या कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय स्थापन केले होते, त्याच ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होत आहे, याचा मला अत्यानंद होत आहे, असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज काढले. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणावेळी ते बोलत होते. उभयतात सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. सर्किट बेंच उद्घाटन सोहळा 16 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला होईल, असेही न्या. गवई यांनी सांगितले.
डॉ. जाधव यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी न्यायमूर्ती गवई यांनी घेतलेल्या ठाम आणि आग्रही भूमिकेबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्यामुळे सर्किट बेंच मान्यतेला गती मिळाली, असे डॉ. जाधव म्हणाले. त्यावर न्या. गवई यांनी, आपण पन्नास वर्षांपासून कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला व या प्रदीर्घ लढ्यात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला, असे सांगितले.
आपले पिताजी बिहारचे राज्यपाल रा. सु. गवई यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते, असे डॉ. जाधव यांनी न्या. गवई यांना सांगितले. त्याचप्रमाणे ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निकट संबंध होते. डॉ. आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी काळा राम मंदिर सत्याग्रहासारख्या लढ्यात सहभाग घेतला होता, अशा आठवणींनाही न्या. गवई यांनी उजाळा दिला.
सर्किट बेंचचे नियमित कामकाज सोमवार, दि. 18 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. सर्किट बेंचचे उद्घाटन शनिवार, दि. 16 ऑगस्ट रोजी होईल, असे आधी ठरले होते. तथापि, उद्घाटन झाल्याबरोबर लगेचच न्यायालयीन कामकाज सुरू व्हावे, या द़ृष्टिकोनातून उद्घाटन सोहळा रविवार, दि. 17 ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी डॉ. जाधव यांच्याशी बोलताना दिली.
सर्किट बेंच उद्घाटनाआधी आपला मंडणगड येथे दौरा असल्याचे न्या. गवई यांनी सांगितले. तेव्हा सर्किट बेंच उद्घाटनासाठी आपण पूर्ण वेळ द्यावा, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे. कोल्हापूरच्या समृद्ध परंपरेप्रमाणे हा सर्किट बेंच उद्घाटन सोहळा ऐतिहासिक स्वरूपात साजरा व्हावा, अशी अपेक्षा न्या. गवई यांनी व्यक्त केली. त्यावर महासैनिक दरबार हॉल येथे हा सोहळा होत असून, तो ऐतिहासिक भव्य स्वरूपात साजरा होईल, असे डॉ. जाधव म्हणाले.