कोल्हापूर सर्किट बेंचचा 17 ऑगस्टला शानदार शुभारंभ Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench Inauguration |कोल्हापूर सर्किट बेंचचा 17 ऑगस्टला शानदार शुभारंभ

सरन्यायाधीश गवई, मुख्य न्यायमूर्ती अराधे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती; अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांची माहिती; लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी, मेरी वेदर ग्राऊंडवर भव्य मंडप उभारणी, 5000 जणांची बैठक व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Circuit Bench Grand Ceremony

कोल्हापूर : साडेचार दशकांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकारांच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभांरभ दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा व कोल्हापूरला साजेशा थाटात होणार आहे.

शुभारंभानंतर पुढील सर्व कार्यक्रम नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर उभारण्यात येणार्‍या भव्य शामियानात होणार आहेत. कोल्हापूर सर्किट बेंच शुभारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. उच्च न्यायालयातील 12 न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील न्यायालयांचे प्रधान न्यायाधीश, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी, सदस्य, सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे अध्यक्ष, तीन हजारांवर वकील, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, पक्षकार समितीसह पाच हजार समुदायाच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे, असे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. तुकाराम पाडेकर, सेक्रेटरी अ‍ॅड. मनोज पाटील, जॉईंट सेक्रेटरी अ‍ॅड. सुरज भोसले, लोकल ऑडिटर अ‍ॅड. प्रमोद दाभाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी साडेचार दशकापासून सुरू असलेल्या लोकलढ्याला प्रत्यक्षात पाठबळ दिलेले, किंबहुना कोल्हापूर खंडपीठसाठी सर्वप्रथम अग्रलेख लिहून शासन, न्यायव्यवस्थेसह समाजातील सर्वच घटकांचे लक्ष वेधून घेणारे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना कोल्हापूर सर्किट बेंच शुभारंभासाठी जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या वतीने निमंत्रित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, असेही अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांनी सांगितले.

सरन्यायाधीश गवई, न्या. अराधे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरव

या सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचा खंडपीठ कृती समिती व जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

कोल्हापूर सर्किट बेंच शुभारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन मुंबई उच्च न्यायालय व शासनस्तरावर करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेऊन खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने स्थानिक नियोजनासाठी 20 कमिट्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. सर्किट बेंच इमारत स्थळासह मेरी वेदर ग्राऊंड या कार्यक्रमस्थळी नियोजनात कसर राहू नये,याची दक्षता घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने वाहन पार्किंगसाठीही शहर वाहतूक शाखेतील पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतून येणार्‍या माध्यम प्रतिनिधींच्या बैठकीची उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे, असेही अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

मनपा आयुक्तांची सोमवारी भेट घेणार : अ‍ॅड. व्ही. आर. पाटील

सोहळ्यासाठी महत्त्वाच्या व्यक्ती कोल्हापुरात येत आहेत. या निमित्ताने भाऊसिंगजी रोडवरील डांबरीकरणासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोल्हापूर महापालिका आयुक्त यांची सोमवारी (दि. 11) सकाळी संयुक्त शिष्टमंडळ भेट घेऊन चर्चा करेल. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या समवेतही अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल, असे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात होणार 50 हजार खटल्याची सुनावणी

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे 1 लाख 30 हजारांवर खटले मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. पहिल्या टप्प्यात 50 हजारांवर खटल्यांची सर्किट बेंचमध्ये सुनावणी शक्य आहे. रविवार, 17 ऑगस्टला शुभारंभ सोहळा झाल्यानंतर लागलीच दुसर्‍या दिवसापासून म्हणजे सोमवारी (दि. 18) सर्किट बेंचचे कामकाज चालणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT