

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर होणे म्हणजे साडेचार दशके सुरू असलेल्या लोकलढ्याचा मोठा विजय आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्याला न्याय मिळाला आहे. भविष्यातही डॉ. जाधव यांच्यामुळेच कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागू शकेल, असा विश्वास कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी व्यक्त केला.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या मंजुरीसाठी चार दशकांहून सुरू असलेल्या लोकलढ्याला पाठबळ देऊन शासन व न्याय यंत्रणेकडे पाठपुरावा केल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. रणजित कवाळे, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सेक्रेटरी अॅड प्रवीण पाटील यांनी गौरव केला. असोसिएशन पदाधिकार्यांनी डॉ. जाधव यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्याने लढाई संपलेली नाही. कोल्हापूर खंडपीठ होईपर्यंत आपणाला पाठपुरावा करावा लागणार आहे. कोणत्याही स्थितीत शेंडापार्क परिसरात कोल्हापूर खंडपीठ स्थापन झाले पाहिजे. खंडपीठाच्या वास्तूसह अत्यावश्यक सुविधांसाठी शासनस्तरावरून भरीव निधी उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. येत्या 17 ऑगस्टला होणार्या शुभारंभप्रसंगी शासनाकडून कोल्हापूरसाठी भरीव सहकार्य होईल अशी आशा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. रणजित कवाळे यांनी दै. ‘पुढारी’ चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. ते म्हणाले, कोल्हापूरला राजकीय गॉडफादर नसताना सर्किट बेंचला मंजुरी मिळाली आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव हेच कोल्हापुरातील लोक चळवळीचे गॉडफादर ठरले आहेत. डॉ. जाधव यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्याला मोठे यश मिळाले आहे. भविष्यात कोल्हापूर खंडपीठही त्यांच्याच प्रयत्नामुळे होईल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सेक्रेटरी प्रवीण पाटील यांनीही डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अभिनंदन केले. यावेळी झालेल्या चर्चेत महिला प्रतिनिधी योगिता सु. पाटील, पदाधिकारी अॅड. विजय पाटील, अॅड. उल्हास पवार, अॅड. सत्यवान शेजवळ यांनीही सहभाग घेतला.