kolhapur circuit bench  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench | कोल्हापूर सर्किट बेंचचे सरन्यायाधीशांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन; कोल्हापुरात मोठा उत्साह

Kolhapur Circuit Bench | कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Circuit Bench Opening ceremony

कोल्हापूर ः कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांनी उराशी जपलेले उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे स्वप्न आज, रविवार 17 ऑगस्ट 2025 रोजी साकार झाले. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन झाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शाहू महाराज, पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, खा. धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहाही जिल्ह्यातील मान्यवर आदी यावेळी प्रमुख उपस्थित आहेत.

कोल्हापुरात मोठा उत्साह

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजी नगर व गोवा या खंडपीठानंतर राज्यात सोमवारपासून कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायदानाचा शुभारंभ होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील सुलभता यामुळे प्राप्त होणार आहे.

सर्किट बेंच उद्घाटनासाठी कोल्हापुरात मोठा उत्साह दिसून येत आहे. शनिवारी जेव्हा कोल्हापुरात सरन्यायाधीशांचे आगमन झाले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या कोल्हापुरकरांनी त्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले होते.

मुख्य सोहळा मेरी वेदर मैदानावर

कोल्हापूर सर्किट बेंच येथील इमारतीत उद्घाटनानंतर मुख्य कार्यक्रम मेरी वेदर मैदानावर होणार आहे. येथे समारंभासाठी मोठी गर्दी झाली आहे.

येथे राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरन्यायाधीश बी. आर. गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

सहाही जिल्ह्यातील खंडपीठ कृती समितीच्या प्रमुखांनी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाहिर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला.

या न्यायमंदिरात संविधानाचे पालन होईल...

सोहळ्यात बार कौन्सिलचे सदस्य सिंधुदुर्गचे अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी स्वागत केले. ते म्हणाले, सरन्यायाधीश गवई जी हे आपल्यासाठी देवदूत आहेत. त्यांनी खंडपीठासाठी नेहमीच पाठिंबा दिला. देसाई यांनी न्या. आलोक आराधे यांचेही आभार मानले.

देसाई यांनी वकील संघटनांनी सर्किट बेंचसाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्यांनी न्यायपालिकेतील वरिष्ठ आणि ज्या राजकीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांच्याविषयींच्या आठवणींनाही उजाळा दिला. या न्यायमंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचेच पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपस्थितांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT