Chandoli Dam Release water
चांदोली धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
कोल्हापूर

कोल्हापूर : चांदोली धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवार (दि.२३) सकाळी ११ वाजता वीजनिर्मिती केंद्रातून १६००, वक्रद्वारातून २२०० क्युसेक असा ३८०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे, भेंडवडे, खोचीयांच्यासह नदीकडच्या गावांना पुराचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. डोंगर माथ्यावरील ओहोळांचे आणि धबधब्यांचे पाणी वारणा नदीपात्रात येत असल्याने नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरले असून ऊस, भात, सोयाबीन पिके पाण्याखाली गेली आहेत. तर नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अमृतनगर -चिकुर्डे दरम्यानच्या वारणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामूळे चादोली धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढून धरण लवकरच सांडवा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावाना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT