हुपरी : हातकणंगले तालुक्यातील यळगुड येथील जवाहर साखर कारखाना पेट्रोल- पंपाजवळ असणाऱ्या टायर पंक्चर दुकानदाराचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. गिरीष पिल्लाई (वय ५०, मुळ केरळ, सध्या रा. विशालनगर, हुपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दुकानातच हा खून झाला आहे.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांच्यासह हुपरीचे पोलीस अधिकारी हे घटनास्थळांवरील माहिती घेऊन तपास करीत आहेत. गिरीष पिल्लाई यांचे पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चरचे गेल्या २५ वर्षांपासून दुकान आहे. त्यांची पत्नी हुपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पत्नी व मुलांना आपल्या मूळ गावी केरळ मध्ये पाठविले होते.
रात्री दुकान बंद करून ते तेथेच झोपले होते. त्यांच्या पत्नीने रात्री त्यांना फोन केला होता. मात्र, त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी पतीच्या मित्राला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मित्राने गिरिष यांच्या दुकानात जाउन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांच्या पोटावर चाकूचे आणि डोक्यावर लोखंडी टॉमीने वर्मी घाव असल्याचे आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीसांना याची माहिती दिली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.