Bhogawati Sugar Factory  Pudhari
कोल्हापूर

Bhogawati Sugar Factory | कर्जाच्या डोंगरावर ‘दिल्लीवारी’; भोगावतीच्या १५ संचालकांचा हवाई दौरा वादात!

चार महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकीत; सहा वर्षांपासून सवलतीची साखर नाही, तरी पुरस्कारासाठी लाखोंच्या खर्चावर सभासदांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

Bhogawati Sugar Factory Director Board Delhi Visit

आशिष ल. पाटील

गुडाळ : भोगावती साखर कारखाना ५०० कोटी रुपयांहून अधिक कर्जाच्या बोजाखाली असताना कामगारांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच सभासदांना सहा वर्षांपासून सवलतीची साखर मिळालेली नसल्याच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी संचालक मंडळातील १५ संचालकांसह दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या दिल्ली हवाई दौऱ्यावरून कारखाना कार्यक्षेत्रात प्रश्न उपस्थित होत आहेत.

येत्या रविवार, दि. २७ रोजी होणाऱ्या भोगावती कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शेतकरी संघटनेसह काही जागृत सभासद संचालक मंडळाला या खर्चाबाबत जाब विचारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या कथित उधळपट्टीबद्दल ऊस उत्पादक सभासद आणि कामगारांमध्ये नाराजी असल्याचेही बोलले जात आहे.

कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढत असतानाच आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या डिस्टलरीतील कंट्री लिकर निर्मिती दोन वर्षांहून अधिक काळ बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाकडे ठोस नियोजन नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याशिवाय हंगामी कर्मचाऱ्यांचे रिटेन्शन अलाउन्स थकीत असून, कामगारांच्या पतसंस्थेला कारखान्याकडून सुमारे ४१ लाख रुपये देणे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कामगारांच्या कर्जावरील व्याजाचा बोजा वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुरस्कारासाठी १७ जणांचे दिल्ली दौरे

नॅशनल हेवी इंजिनिअरिंगकडून साखर उताऱ्याबाबत १२.७० रिकव्हरीसाठी मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी संचालक व अधिकाऱ्यांचे मिळून १७ जणांचे शिष्टमंडळ पुणे-दिल्ली-पुणे असा हवाई प्रवास करून गेल्याचे सांगण्यात येते. आर्थिक अडचणीच्या काळात एवढ्या मोठ्या शिष्टमंडळाच्या दौऱ्यावर होणाऱ्या खर्चाबाबत सभासदांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वी २००२ मध्ये कारखान्याला १३.१६ रिकव्हरीसाठी नवी दिल्ली येथे पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी कारखान्याची आर्थिक परिस्थिती तुलनेने भक्कम असतानाही तत्कालीन चेअरमन सदाशिवराव चरापले यांच्यासह दोन संचालक पुरस्कार स्वीकारण्यासाठी रेल्वेने दिल्लीला गेले होते. या पार्श्वभूमीवर सध्याच्या १७ जणांच्या हवाई दौऱ्याची तुलना केली जात असून, त्यावरून संचालक मंडळावर टीका होत आहे.

या संदर्भात कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT