Kolhapur Bandh
मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने कोल्हापूर बंद तात्पुरता स्थगित केला आहे.   Pudhari News Network
कोल्हापूर

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने कोल्हापूर बंद तात्पुरता स्थगित

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्यामुळे हद्द वाढ आणि खंडपीठाच्या मागणीसाठी पुकारलेला कोल्हापूर बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री पुन्हा जेव्हा कोल्हापूर दौऱ्यावर येतील, तेव्हा आंदोलन केले जाईल असा इशारा कृती समितीने दिला आहे.

कोल्हापूर बंदची हाक का देण्यात आली होती?

  • कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंचची मागणी

  • या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी

  • कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी बंदची हाक दिली होती

कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंच या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी मंगळवारी (दि. 25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यावेळी कोल्हापूर बंद ठेवण्यात येणार होते. याबाबतचा निर्णय कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

दरम्यान, गनिमी काव्याने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळे फासण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला होता. मंगळवारी वाहनधारकांनी पुकारलेल्या बंदला यावेळी पाठिंबा जाहीर देण्यात आला होता. यासाठी कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात जमून बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने कोल्हापूर बंद तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सर्जेराव खोत म्हणाले, हद्दवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. जनरेटा लावल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी टिप्पणी केल्याने त्याचवेळी प्राथमिक यश मिळाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या भेटीनंतर नोटिफिकेशन काढणे शिल्लक आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई करूया.

SCROLL FOR NEXT