उद्या कोल्हापूर बंद

हद्दवाढ, सर्किट बेंच प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार; कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निर्णय
कोल्हापुरात उद्या कडकडीत बंद
कोल्हापुरात उद्या कडकडीत बंदPudhari File Photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंच या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी मंगळवारी (दि.25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यावेळी कोल्हापूर बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सर्जेराव खोत होते.

दरम्यान, गनिमी काव्याने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळे फासण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मंगळवारी वाहनधारकांनी पुकारलेल्या बंदला यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात जमून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे.

बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सर्जेराव खोत म्हणाले, हद्दवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. जनरेटा लावल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी टिप्पणी केल्याने त्याचवेळी प्राथमिक यश मिळाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांंच्या भेटीनंतर नोटिफिकेशन काढणे शिल्लक आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई करूया. अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, खंडपीठासाठी सुरू असलेल्या आंदोलनात केवळ आश्वासनच मिळाले. विद्यमान मुख्यमंत्र्यांना सातवेळा भेटलो. मात्र त्यांनी खंडपीठाबाबत बैठक घेतली नाही. हद्दवाढीसंदर्भात प्रस्ताव मागवून दोन वर्षे झाली. तरीही निर्णय नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी बंदची हाक दिली आहे.

कोल्हापुरात उद्या कडकडीत बंद
कोल्हापू : सत्तार गमतीने बोलतात, किती गंभीर घ्यायचे : पालकमंत्री दीपक केसरकर

अ‍ॅड. रणजित गावडे म्हणाले, कोल्हापुरात टोल आंदोलन यशस्वी होते. मग हद्दवाढ आणि खंडपीठ आंदोलनाचे भिजत घोंगडे का? टोलप्रमाणे प्रखर आंदोलन केले पाहिजे. बाबा पार्टे म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि कोल्हापूरसाठी सर्किट बेंच या दोन्ही प्रश्नांसाठी तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आर. के. पोवार म्हणाले, या दोन्ही प्रश्नांवर सरकार म्हणून काहीच भूमिका घेतली जात नाही. मंत्री येतात, निवेदन घेऊन आश्वासन देतात. यापेक्षा काहीच होत नाही. विद्यमान मुख्यमंत्री नगर विकासमंत्री असताना स्वत: हद्दवाढीचा प्रस्ताव मागवून घेतला. आता मुख्यमंत्री झाले तरी त्यावर अद्याप निर्णय नाही. याचा जाब विचारण्यासाठी कोल्हापूर बंद ठेवूया. या दोन्ही प्रश्नांवर सरकारने वेळोवेळी फसवणूक केल्याचा आरोप करून दिलीप देसाई म्हणाले, लोकसभेत सत्ताधार्‍यांना लीड कमी मिळाले, जागा कमी का झाल्या याचे आत्मचिंतन मुख्यमंत्र्यांनी करावे. मुख्यमंत्र्यांना काळे निशाण दाखवून कोल्हापूर बंदने स्वागत करूया.

अशोक भंडारे म्हणाले, तत्कालीन नगर विकासमंत्री रामराव आदिक यांनी महापालिका सभागृहात येउन हद्दवाढीचे दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूरकरांची केवळ चेष्टाच केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, सोमवारी महापालिका प्रशासकांची भेट घेऊन हद्दवाढीसाठी काय केले याचा जाब विचारूया. मुख्यमंत्री कोण आहेत याचा विचार न करता सरकार म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे, असे बाबूराव कदम म्हणाले. कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, हद्दवाढ आणि खंडपीठबाबत शत्रू कोण, मित्र कोण हे तपासले पाहिजे. आम जनतेच्या सहभागातून जनआंदोलनातून दबाव निर्माण केला पाहीजे.

कोल्हापुरात उद्या कडकडीत बंद
Kolhapur : कोल्हापुरात मंगळवारी रिक्षा, टॅक्सी बंद

सतिीशचंद्र कांबळे म्हणाले, या दोन्ही प्रश्नांवर राजकीय इच्छाशक्ती नसल्याने प्रश्न सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या छातीत धडकी भरेल असे आंदोलन करूया. अनिल घाटगे म्हणाले, कोल्हापूर बंदबरोबरच सरकारशी चर्चा सुरू ठेवावी. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवून आंदोलनात सातत्य राखूया, असे दिलीप पवार यांनी सांगितले. कोल्हापूर बंदबरोबरच शहरातील आमदार-खासदारांच्या घरांसमोरही आंदोलन केले पाहिजे, असे पद्मा तिवले म्हणाल्या. बैठकीस महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, संभाजी जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news