FDA Raid Pudhari
कोल्हापूर

Kolhapur FDA Raid | बांबवडे परिसरात 'एफडीए' ची धडक मोहीम; कारवाईच्या धास्तीने हॉटेल, धाबे बंद

विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Bambavde Food And Drug Administration Raid

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे आणि परिसरातील हॉटेल्स, बेकरी तसेच धाब्यांवर मंगळवारी (दि.१४) सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बांबवडे बाजारपेठ व परिसरातील काही हॉटेल्स आणि बेकरीमध्ये अन्नभेसळीचा संशय व्यक्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक तपासणी सुरू केली. पथकाने अनेक हॉटेल्स आणि बेकरींना भेटी देत खाद्यपदार्थांची पाहणी केली. संशयास्पद वाटलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचे पथक बांबवडे बाजारपेठेत दाखल झाल्याची माहिती मिळताच अनेक हॉटेल व बेकरी चालकांची धावपळ उडाली. कारवाईच्या भीतीने काही व्यावसायिकांनी ग्राहकांची गर्दी असतानाच हॉटेल्स बंद करून दुकानांना कुलूप लावले. त्यामुळे सायंकाळच्या गजबजलेल्या बाजारपेठेत या कारवाईची जोरदार चर्चा रंगली.

या कारवाईचा परिणाम केवळ बांबवडेपुरता मर्यादित राहिला नाही. गोगवे, डोणोली आणि परिसरातील अनेक धाबेचालकांनीही कारवाईच्या धास्तीने रात्री आपले धाबे बंद ठेवणे पसंत केले. नेहमी ग्राहकांनी गजबजलेले असणारे धाबे मंगळवारी रात्री ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली. कारवाईची कोणतीही पूर्वकल्पना प्रसारमाध्यमांना किंवा इतर कोणालाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे पथकाच्या अचानक झालेल्या धडक तपासणीमुळे व्यावसायिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT