

कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी अवधूत लहू धुरे (वय २३, रा. फये, शेणगाव, ता. भुदरगड), तेजस्विनी विक्रम बुरबुसे (वय २४, रा. गणेशनगर, गारगोटी) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३२ ग्रॅम चोरीचे दागिने जप्त केले. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी टेम्पो खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी चोरी केल्याची माहिती समोर आली.
शीतल रामचंद्र गावडे (वय २२, रा. महेश्वरी कॉलनी, नागदेववाडी) यांच्याकडे अवधूत व तेजस्विनी भाडेकरू होते. दोन दिवसांत हे दोघेही गायब झाले. गावडे यांच्या घरातील ३ तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्यांचा नेकलेस, २ ग्रॅमची अंगठी असा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. संशयित अवधूत दागिने विक्रीसाठी नवीन वाशी नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
यानुसार पथकाने सापळा रचून अवधूत व तेजस्विनी यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली.