Sujay Kadam transfer Kolhapur
आशिष ल.पाटील
गुडाळ : गोकुळच्या अवसायनातील संस्थांच्या सुनावणीत अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहाय्यक निबंधक (दुग्ध) सुजय कदम यांची तडकाफडकी बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्या जागी शाहूवाडीचे सहाय्यक निबंधक कृष्णात ठाकरे यांची नियुक्ती झाल्याचे समजते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले आ. शिवाजीराव पाटील यांनी कदम यांच्या बदलीची केलेल्या मागणीला 24 तास उलटण्यापूर्वीच कदम यांची बदली झाल्याने जिल्ह्यातील महायुतीतील संघर्ष वेगळ्या वळणावर पोहोचला आहे.
गोकुळला संलग्न असलेल्या 1320 संस्थांची अवसायानाबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहे. कदम यांच्याकडून या संस्थांची सुनावणी घाई गडबडीने उरकली जात असल्याची तक्रार झाल्याने बुधवारी तातडीने त्यांना मुंबईला मंत्रालयात बोलावून घेण्यात आले होते.
7 एप्रिल पासून 5 कार्यालयीन दिवसांत तब्बल 399 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया झाली. दररोज सरासरी 80 संस्थांच्या होत असलेल्या सुनावणीवर आक्षेप घेण्यात आले. प्रतिवादी संस्थानी न्यायालयात आक्षेप घेतल्यास अशी सुनावणी प्रक्रिया रद्द होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय डी डी आर (दुग्ध), पुणे यांच्या पूर्व संमतीशिवाय कदम यांनी 6 एप्रिलरोजी जाहीर केलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमावर ही तीव्र आक्षेप आल्याचे सांगण्यात आले. त्यातूनच कदम यांची तडकाफडकी बदली झाल्याचे समजते.
अद्याप ९०० च्या आसपास दूध संस्थांची सुनावणी बाकी असून सहायक निबंधकांना न्यायालयाच्या तारखेपूर्वी केवळ कार्यालयीन कामकाजाचे सात दिवस मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात ही सुनावणी पूर्ण न झाल्यास सर्किट बेंच मधील 28 एप्रिलची निवडणुकीबाबतची सुनावणीही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एका बाजूला घाई गडबडीत सुरू असलेली सुनावणी आणि दुसऱ्या बाजूला सुनावणीत येत असलेले अडथळे यामध्ये महायुती अंतर्गत सत्तारूढ गट आणि विरोधी गटातील शह - काटशहाचे राजकारण सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या संघर्षातूनच भाजपाचे आ. शिवाजीराव पाटील यांनी नूतन सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्या थेट बदलीचीच मागणी केली होती.