कोल्हापूर

कोल्हापूर : दत्तवाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; एक शेतकरी गंभीर जखमी

मोहन कारंडे

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दानवाड रस्त्यावर सिद्धनाळे मळा येथे शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. सचिन अण्णाप्पा सिदनाळे ( वय ४५ ) असे शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये दत्तवाडमधील कुत्र्यांच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

सिद्धनाळे मळा येथील शेताकडे सचिन सिदनाळे सकाळी दहाच्या सुमारास गेले होते. यावेळी तीन ते चार कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेवर, खांद्यावर व हाता पायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी त्यांची या कुत्र्यापासून सुटका केली. सचिनवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल सांगली येथे पाठवण्यात आले आहे.

याबाबत माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीत कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिकेचे श्वानपथक, वन विभाग तसेच पोलीस प्रशासन मिळून एकत्रित कारवाई करू व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन भांगे यांनी दिले. गावातील तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आव्हानही त्यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रामसेवक संतोष चव्हाण, पोलीस पाटील संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

१८ ऑगस्ट रोजी अपूर्वा शिरढोणे या शाळकरी मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केले होते. सुदैवाने तिचे प्राण वाचले आहेत. त्या घटनेनंतर २२ ऑगस्ट रोजी दत्तवाड येथे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात व शिरोळच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे-धुमाळ यांनी भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी आदींना आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून त्वरित या हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत. प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त केला असता तर हा हल्ला झाला नसता अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT