Kolhapur Airport News pudhari
कोल्हापूर

Kolhapur Airport News: कोल्हापूर विमानतळावर विमानाचे 'हार्ड लँडिंग'; ६४ प्रवाशांचा जीव टांगणीला, थोडक्यात बचावले

Anirudha Sankpal

Kolhapur Airport News: नवी मुंबई ते कोल्हापूर विमानसेवेदरम्यान काल रात्री एक मोठी दुर्घटना टळली. रात्री ८ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ६४ प्रवाशांना घेऊन येणारे विमान कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना त्याचे चाक जमिनीवर जोरात आदळले. या 'हार्ड लँडिंग'मुळे विमानाला मोठा हादरा बसला, ज्यामुळे प्रवाशांच्या काळजात धस्स झाले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईवरून आलेले हे विमान धावपट्टीकडे वेगाने येत असताना उंची कमी करताना चाकांचा जमिनीला जोराचा स्पर्श झाला. विमान धावपट्टीवर स्थिर होण्याऐवजी पुन्हा उसळले. ही धोक्याची घंटा ओळखून वैमानिकाने तात्काळ 'गो अराऊंड' (Go-Around) करण्याचा निर्णय घेतला आणि विमान पुन्हा हवेत झेपावले. कोल्हापूर शहरावर एक घिरटी मारल्यानंतर, आरएमपी (RMP) प्रणालीचा वापर करून काही वेळातच विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे, लँडिंगनंतर अर्ध्या तासातच या विमानाने ७० प्रवाशांना घेऊन पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने यशस्वी उड्डाण केले. मात्र, या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगच्या सुविधा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात उतरणारे विमान तांत्रिक कारणास्तव गोव्यातील मोपा विमानतळावर वळवण्यात आले होते.

विमानतळ प्रशासनाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांची पुन्हा एकदा काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी आता कोल्हापूरकर नागरिकांमधून केली जात आहे. सुदैवाने, वैमानिकाच्या कौशल्यामुळे सर्व ६४ प्रवासी सुखरूप आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT