kolhapur | कुलगुरू निवडीतील विलंबाने विद्यापीठाचे कामकाज खोळंबले

kolhapur |
kolhapur | कुलगुरू निवडीतील विलंबाने विद्यापीठाचे कामकाज खोळंबले
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : राज्यात विद्यापीठाचे कुलगुरूपद हे अत्यंत महत्त्वाचे पद समजले जाते. कार्यक्षेत्रातील अनेक संस्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे, उत्थानाचे, संशोधनाचे क्षेत्र विस्तारण्यासाठी या पदावरील व्यक्तीला संबंधित विद्यापीठाची समग्र माहिती, आव्हाने आणि इतिहास अवगत असणे आवश्यक असते. त्यासाठी विद्यमान कुलगुरूंची मुदत संपण्यापूर्वी नव्या कुलगुरूंची निवड होणे कायद्याला अभिप्रेत आहे.

इतकेच नव्हे, तर यापूर्वी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या काळात संबंधित निवड ही विद्यमान कुलगुरूंची मुदत संपण्यापूर्वी किमान 7 ते 8 महिने पूर्ण व्हावी. जेणेकरून नव्या कुलगुरूंना विद्यापीठाच्या बारीकसारीक समस्यांची कल्पना अवगत होईल आणि पहिल्या दिवसापासून त्यांना कार्यक्षमतेने काम करता येईल, अशा आशयाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. दरम्यान, अलेक्झांडर यांची मुदत संपली. हा प्रस्ताव मागे पडला असला, तरी सध्याच्या प्रचलित महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंची मुदत संपण्यापूर्वी नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

कुलगुरूपदाच्या निवडीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम 19 अन्वये शोधसमिती गठित करावी लागते. या समितीमार्फत पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविले जातात. त्यांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातील निवडक व्यक्तींची शिफारस ही समिती कुलपतींना करते आणि कुलपतींनी संबंधितांचे सादरीकरण व मुलाखत यातून अंतिम निवडीवर शिक्कामोर्तब करणे कायद्याला अभिप्रेत आहे. तथापि, ही निवड प्रक्रिया या पद्धतीने होत नाही. त्याला विलंब लागतो. कुलगुरूपद रिक्त राहते. अतिरिक्त कार्यभार असलेले कुलगुरू धोरणात्मक निर्णय घेणे टाळतात. फायलींचा डोंगर निर्णयाविना उभा राहतो. या शैक्षणिक नुकसानीची जबाबदार कोणाची? कायद्यामध्ये राज्यपाल ही व्यक्ती नसून ती संस्था मानली गेली आहे. त्यांच्या कार्यालयातील सचिवांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण होणे अभिप्रेत आहे. परंतु, सध्या कायद्यावर अंतिम शिक्कामोर्तब करणार्‍या कार्यालयाकडून स्वतःच्याच स्वाक्षरीने संमत झालेल्या कायद्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई होते आहे. (क्रमशः)

शिवाजी विद्यापीठात परंपरेला छेद

शिवाजी विद्यापीठात नव्या कुलगुरूंच्या पदभारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या जयंतीदिनी (22 सप्टेंबर) स्वीकारण्याची प्रथा रूढ झाली होती. बरोबर त्याच तारखेला मावळत्या कुलगुरूंचा सत्कार आणि नव्या कुलगुरूंचे स्वागत होत होते. पण, या परंपरेलाही छेद देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news