कोल्हापूर

कोल्हापूर : तहसिलदार यांना धमकाविल्याप्रकरणी टोप येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

backup backup

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शासकीय आधिकाऱ्यास धमकाविल्याप्रकरणी टोप येथील शिवाजी पोवारसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगलेचे तहसिलदार यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यांत फिर्याद दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण करत, बेकायदेशीर जमाव गोळा करून त्यांना धाक दाखवल्या प्रकरणी टोप येथील शिवाजी पोवार सह पाच जणांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी आनंदराव पवार, संभाजी बाबासो पवार, अविनाश ईश्वरा कलगुटगी, अमोल अर्जुन पवार व तानाजी आनंदराव पवार ( सर्व रा. गंगाराम नगर, टोप, ता. हातकणंगले ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा हातकणंगले तहसिलदार सुहास गाडे यांनी काल रात्री स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून ही फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तहसिलदार सुहास गाडे हे बुधवारी (दि.२८) सकाळी शिये फाटा येथून हातकणंगलेकडे निघाले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास शिये फाटा येथे त्यांना गौण खनिज वाहतूक करणारे तीन डंपर दिसले. त्यांनी तात्काळ आपल्या चालकाला मोटार बाजूला घ्यायला लावत डंपर रोखले. डंपर चालकांकडे त्यांनी परवाने मागितले. पण डंपर चालकांनी परवाने दाखविण्याऐवजी शिवाजी पवार यांना घटनास्थळी बोलाविले. शिवाजी पोवार यांनी यावेळी तहसिलदारास धमकी दिली. शिवाजी पवार यांच्या सोबत संभाजी पवार, अविनाश कलगुटगी, अमोल पवार व तानाजी पवार हे ही होते. मात्र, तहसिलदार गाडे यांनी कठोर कारवाईचे संकेत देत पोलीस आणि महसूल प्रशासनाला घटनास्थळी बोलावून घेतले. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT