कोल्हापूर

कोल्हापूर : कडवी धरणात ३९.७३ टक्के पाणीसाठा; उपलब्ध पाणी समाधानकारक, पाणी टंचाई भासणार नसल्याचे चित्र

मोहन कारंडे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : कडवी खोऱ्यातील गावांची तहान भागविणा-या शाहुवाडीतील निनाई परळे येथील कडवी धरणात सध्या ०.९९ टीएमसी म्हणजेच ३९.७३ टक्के इतका पाणीसाठा आहे. सध्यातरी पाणीसाठा समाधानकारक असल्याचे चित्र आहे. कडवी नदीपात्रात सातत्याने १२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणातील पाण्याचे शेती आणि पिण्यासाठी योग्य व सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने केल्याने जुन अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उत्तम मोहिते यांनी दिली.

गत पावसाळ्यात धरण पाणलोट क्षेत्रात ३७९९ मिमी इतका पाऊस झाला होता. धरण तीनदा ओव्हर फ्लो झाले होते. आज धरणाच्या पाण्याची पातळी ५९०.५० मीटर असून पाणीसाठा २८.७०  द.ल.घ.मी (०.९९ टीएमसी) म्हणजेच ३९.७३ टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी ५८९.१० मीटर तर धरणाचा पाणीसाठा २४.३७ दलघमी इतका होता. गतवर्षीपेक्षा धरणात सहा टक्के पाणीसाठा अधिक आहे. त्यावेळी धरणात ( ०.८४ टीएमसी) म्हणजेच ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरणातून १२० क्यूसेस पाण्याचा कडवी नदीपात्रात विसर्ग सुरू असून वालुर, सुतारवाडी, करुंगळे, भोसलेवाडी, पेरिड, शिरगाव, सावर्डे, पाटणे या आठ ठिकाणच्या कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यावर पाणी अडवल्याने नदीपात्रात पाणीसाठा भरपूर आहे. या पाण्याचा उपयोग परळे निनाई, भेंडवडे, लोळाणे, पुसार्ले, आळतुर, वारूळ,  करुंगळे, निळे, कडवे, येलूर, पेरिड, भोसलेवाडी, गाडेवाडी, मलकापूर, कोपार्डे, सांबु, शिरगाव, ससेगाव, सावर्डे, मोळवडे, सवते, शिंपे, पाटणे या २३ गावांना शेती व पिण्यासाठी होत आहे. पावसाळ्यानंतर आजअखेर या मध्यम प्रकल्पातील ६०.२७ टक्के म्हणजे १.५२ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे.

मे'च्या मध्यात देखील धरणात जवळपास ४० टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे कडवी नदीपात्रा शेजारील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला. तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.

यावर्षी धरणात समाधानकारक  पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणी टंचाईची झळ कडवी नदीपात्रा नजीकच्या गावांना बसणार नाही. ऐन उन्हाळ्यातही कडवी नदी कायम वाहती राहणार आहे.
– अजय पुनदीकर, शाखा अभियंता कडवी धरण

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT