कोल्हापूर

Balumama Rathotsava: बाळुमामांच्या महाप्रसादासाठी २० टन धान्य; लाखो भाविकांनी घेतला लाभ

अविनाश सुतार

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा (आदमापूर, ता. भुदरगड) यांच्या भंडारा यात्रेत आज (दि. ६) लाखों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी ११ टन तांदूळ, ५ टन गहू व ४ टन गूळ, डाळी, अशा एकूण २० टन धान्यांचा वापर करण्यात आला. Balumama Rathotsava

देवस्थान प्रशासनाने एकूण बारा काहिलीचा प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसाद वाटपाचे आणि घेण्याचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला. Balumama Rathotsava

उन्हापासून भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्ताच्या घरच्यांना प्रसाद घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती. स्वतंत्र दोन काहील ठेवून भांड्यामध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद पोहोच केला जात होता. त्यामुळे समाधानाचे वातावरण भाविकांमध्ये दिसून येत होते. संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता.
बिद्री साखर कारखाना, गोकुळ दुध संघ व स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट प्रसाद वाटपामुळे गोंधळ झाला नाही. देवस्थान प्रशासकीय समिती सदस्य रागिनी खडके, शिवराज नायकवडी, ग्रामस्थ यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी मानकरी कर्णसिंह भोसले, कृष्णात डोणे यांच्या हस्ते महाप्रसादावर भंडारा व दूध अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद सुरू करण्यात आला.

बाळूमामा देवालय समिती व ग्रामस्थ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, बेळगाव आदी जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवकाने उत्स्फूर्तपणे विना मोबदला सेवा केली. नेटके नियोजन, स्वयंसेवकांची तत्पर सेवेमुळे महाप्रसाद सुरळीत पार पडला. भक्तांचेही चांगले सहकार्य मिळाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT