कोल्हापूर : पंचगंगेची पाणी पातळी ४२ फूट ०१ इंच झाली असून धोक्याच्या पातळीकडे जाण्यासाठी केवळ १ फूट बाकी आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठताच शहरात पूरसदृश स्थिती निर्माण होते. यामुळे शहरातील पूरबाधित भागात भीतीचे सावट पसरले आहे. सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी येत असल्यामुळे ४३ फूट पाणी पातळी येताच सुतारवाड्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यास सुरुवात झाली आहे. Kolhapur Rain Update
मागील चार दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा मंगळवारीही जोर कायम होता. मंगळवारच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने शहरास झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यांवर तळेसदृश स्थिती निर्माण झाली होती.
४५ फुटांवर येताच जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येऊन बावडा रस्ता बंद होण्याचा धोका आहे. रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा-बटाटा मार्केट, शाहूपुरी, कोंडा ओळ या परिसरात पुराचे पाणी येण्याची शक्यता असते. सध्या पाणी पातळी ४१ फुटांवर असल्याने सुतारवाडा परिसरातील नागरिकांसह संभाव्य पूरग्रस्त भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवली असून, पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज आहेत.