KMC Election 2026 Result Sharangadhar Deshmukh Win: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वात हाय व्होल्टेज लढत ही प्रभाग क्रमांक ९ मध्ये झाली. या निवडणुकीत काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करणाऱ्या शारंगधर देशमुख यांच्यासमोर काँग्रेसच्या राहुल माने यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. सुरूवातीला देशमुख पिछाडीवर होते. मात्र अखेर त्यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांना टोला देखील लगावला.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये ज्यावेळी मतमोजणी सुरू झाली त्यावेळी काँग्रेसचे राहुल माने हे आघाडीवर होते. त्यामुळे या भागात चांगला होल्ड असणाऱ्या शारंगधर देशमुख यांना मोठा फटका बसणार का अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच पुढे शारंगधर देशमुख हे १७०० मतांनी पिछाडीवर पडले. यामुळं महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापतींना पराभवाचं तोंड पहावं लागणार का अशी भीती निर्माण झाली होती.
मात्र पुढच्या फेऱ्यांमध्ये शारंगधर देशमुख यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांनी फक्त पिछाडी भरून काढली नाही तर विजय देखील खेचून आणला.
विजयी झाल्यानंतर शारंगधर देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलकी प्रतिक्रिया दिली. त्यांनी 'हा प्रभाग हा माझाच बालेकिल्ला आहे. इथून त्यांना मदत होती होती. मात्र तो त्यांचा बालेकिल्ला आहे असा गैरसमज काही लोकांचा झाला होता. तो आता दूर झाला आहे.' अशी प्रतिक्रिया देत नाव न घेता सतेज पाटील यांना टोला लगावला. तसेच त्यांनी माझी लढाई बावडेकरांविरूद्ध नाही तर बावड्यातील एका नेत्याविरूद्ध असल्याचं स्पष्ट केलं.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मध्ये विशेष लक्ष घातलं होतं. हा मतदारसंघ ऋतुराज पाटील यांच्या दक्षिण विधानसभा मतदार संघाशी निगडित असल्यानं इथली लढत हाय व्होल्टेज होती. देशमुख यांच्यासमोर राहुल माने हा तगडा उमेदवार दिला होता.
विशेष म्हणजे कधी काळी शारंगधर देशमुख हे सतेज पाटील यांचे राईट हँड समजले जात होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीटावरून नाराजीनाट्य निर्माण झालं अन् देशमुख यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सतेज पाटील यांना हा मोठा धक्का मानला गेला.