इंद्रजित शिंदे
पन्हाळा : डोळ्यात भविष्याची सुंदर स्वप्ने, हातात कष्टाचे कौशल्य आणि चेहऱ्यावर सदैव फुलणारे ते निष्पाप हास्य... कुटुंबाचा भक्कम आधार बनू पाहणाऱ्या एका उमद्या २२ वर्षांच्या तरुणाची प्राणज्योत क्षणात मालवावी. एका हसत्या-खेळत्या घराचे हसू एकाच क्षणात हिरावून घेतले जावे, असा काळीज पिळवटून टाकणारा भयानक प्रसंग देवठाणे (ता. पन्हाळा) येथील परीट कुटुंबावर कोसळला आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत असताना केतन संजय परीट (वय २२) या तरुणाचा कामावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अत्यंत करुण अंत झाला.
कुटुंबाची परिस्थिती सावरण्यासाठी आणि आई-वडिलांच्या हाताला आधार देण्यासाठी केतनने अत्यंत मेहनतीने इलेक्ट्रिशियनचे काम शिकले होते. रोजच्याप्रमाणे मंगळवारी तो आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन, मित्रांना हाका मारत, चेहऱ्यावर तेच नेहमीचे हसू घेऊन घराबाहेर पडला होता. कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती की, केतनचे हे घरातून पडणारे पाऊल शेवटचे ठरणार आहे. कामावर असताना अचानक केतनला तीव्र चक्कर आली आणि तो खाली कोसळला. सोबतच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या पाच मिनिटांत त्याला रुग्णालयात दाखल केले. सहकाऱ्यांचे हात थरथरत होते, मनात प्रार्थना सुरू होत्या; पण नियतीचा कौल वेगळाच होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अवघ्या 5 मिनिटांत काय घडले, हे समजायच्या आतच सगळं काही संपलं होतं.
केतनच्या निधनाची बातमी देवठाणे गावात धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. बातमी ऐकून आई-वडिलांनी घातलेला आक्रोश आणि हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. "माझा लेक कामावरून परत येईल," या आशेवर असलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. भावाची साथ सुटल्याने लहान भावाचे अश्रू अनावर झाले होते, तर चुलत्यांचाही कंठ दाटून आला होता. केतनचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू असल्याने त्याचा मित्रपरिवार खूप मोठा होता.
कोणत्याही मित्राच्या हाकेला धावून जाणारा 'जीवाभावाचा सोबती' असा अचानक सोडून गेल्याने मित्रांना अश्रू अनावर झाले होते. अंत्ययात्रेच्या वेळी संपूर्ण देवठाणे गाव सुन्न झाले होते आणि प्रत्येक ग्रामस्थाचे डोळे पाणावले होते. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ आणि चुलते असा मोठा परिवार आहे. ऐन उमेदीच्या वयात, स्वतःचे आयुष्य घडवण्याच्या उंबरठ्यावर असतानाच केतनने घेतलेल्या या कायमच्या निरोपाने संपूर्ण पन्हाळा परिसरातून अत्यंत भावूक वातावरणात हळहळ व्यक्त केली जात आहे.