कौस्तुभ गावडे Pudhari photo
कोल्हापूर

Kaustubh Gawade | पात्र शाळा आणि वाढीव तुकड्यांना शंभर टक्के अनुदान मिळण्यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

Kaustubh Gawade | अनुदानाच्या प्रतीक्षेचा कालावधी संपवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील अनुदानास पात्र शाळा आणि वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे. तसेच २०, ४०, ६० आणि ८० टक्के अनुदानावर असलेल्या सर्व पात्र शाळांना एकरमी शंभर टक्के पूर्ण अनुदान मिळावे, यासाठी शासनदरबारी ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी दिली.

राज्यातील अनेक शाळा वर्षानुवर्षे अंशतः अनुदानाच्या टप्प्यांमध्ये अडकल्या आहेत. अनुदानाचे पुढील टप्पे मिळण्यासाठी चार ते पाच वर्षापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. काही शाळांना पूर्ण अनुदान मिळण्यासाठी दोन ते अडीच दशके लागतात.

या बिलंबामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या कौटुंबिक जबाबदार्‍यांवरही परिणाम होत असल्याचे गावडे यांनी नमूद केले. शासनाने निश्चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या शाळा आणि वाढीव तुकड्यांना निर्धारित वेळेत अनुदान मिळण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची मागणी करण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील शिक्षणव्यवस्थेत अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित असे दोनच प्रकार असावेत, यासाठी निर्णायक लढा उभारणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

सर्व पात्र संस्थांना पूर्ण अनुदान मिळणे आवश्यक

पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे; मात्र केवळ टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याऐवजी सर्व पात्र संस्थांना पूर्ण अनुदान मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका कौस्तुभ गावडे यांनी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT