Kolhapur Kasarwadi Phata Road Traffic Jam
कासारवाडी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या जोतिबा राज्यमार्गावर कासारवाडी फाटा येथे कामाच्या नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना गुडघाभर खड्ड्यातून वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. आज (दि.३१) अवजड वाहने चार वेळा अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अडकलेला डंपर जेसीबीच्या साह्याने काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
टोपपासून कासारवाडी, सादळे-मादळे जाणाऱा १९९ क्रमांकाचा जोतिबा राज्यमार्ग जोतिबा, पन्हाळा व रत्नागिरी महामार्गाला मिळतो. या रस्त्यावरून मोठी वाहतूक सुरू असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचे व रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. कामात नियमितता नसल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहेत. डंपर अडकल्याने शनिवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा राष्ट्रीय महामार्गापर्यंत आल्या होत्या.
जोतिबाकडे जाताना उजव्या बाजूस काम चालू असून डाव्या बाजूचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. यात मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर शनिवारी, रविवारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यातच येथील परिसरातून गौण खनिजाची अवजड वाहतूक होत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे वाहन चालकांना व स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे नियोजन करून रस्ता लवकर पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.