विशाळगड : विशाळगड परिसरात गेली दोन दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर १७३१ मिमी पाऊस बरसला असून गतवर्षी याच तारखेला ११७८ मिमी पाऊस झाला होता. कासारी धरण सध्या ५९.३२ टक्के भरले असून कासारी धरणातून कासारी नदीत प्रतिसेकंद २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कासारी धरण प्रशासनाने दिला आहे.
शाहूवाडीतील २१ व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांना सुजलाम् सुफलाम् करणारे कासारी (गेळवडे) धरण पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी वरदान ठरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नादांरी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. यामधील पडसाळी, कुंभवडे हे लघुप्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गेळवडे हे प्रमुख धरण असून धरणाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पाखाली ६२ गावांना उपसा सिंचन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी नदीवर जागोजागी सुमारे १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. सुमारे ९ हजार ४५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत धरणात १४७ दलघफु इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण १.६५ टीएमसी इतके भरले असून धरणाची पाणीपातळी ६१६.१० मी इतकी आहे. ४६.६० इतका पाणीसाठा धरणात आहे. कासारी नदीपात्रात २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने यवलूज, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे, कांटे, वाळोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन हे बंधारे पाण्याखाली आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा १७ टक्के पाणीसाठा धरणात अधिक आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने कासारी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.