मस्तीची भाषा कागलकर सहन करणार नाहीत Pudhari Photo
कोल्हापूर

मस्तीची भाषा कागलकर सहन करणार नाहीत

संजय पवार; शाहूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समरजित घाटगेंना साथ देण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सिद्धनेर्ली ः छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व सीएसारखे उच्चशिक्षित असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. राजघराण्यातील महिलांबाबत ते अपशब्द वापरत आहेत. त्यांची ही मस्तीची भाषा कागलकर कदापिही सहन करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी दिला. बामणी (ता. कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, सिटू संलग्न सर्व संघटना, किसान सभा या राज्यस्तरीय संघटनांचा घाटगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.

पवार म्हणाले, विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या बोटाला धरून मुश्रीफ राजकारणात आले. समरजितराजे यांच्यावर पातळी सोडून टीका करताना मुश्रीफांनी याची तरी जाणीव ठेवावी. शाहू महाराजांच्या वंशजास निवडून देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होऊया. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, पालकमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांना घरात जाऊन आम्ही ठामपणे पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र, मंत्रिपदाच्या लालसेपोटी हा माणूस मागच्या दाराने कधी पळाला, हे कळालेच नाही. या गद्दाराला कागलची जनता या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेत आहेत. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे राज्य सचिव शिवाजी मगदूम म्हणाले, गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला; मात्र त्यांनी बांधकाम कामगारांना फसविले. त्यांना अद्दल घडविण्यासाठी चाळीस हजार बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय आघाडीवर असतील. यावेळी सुरेश कुराडे, सरपंच अनुराधा पाटील, रंगराव तोरस्कर, विद्या गिरी उपस्थित होते. यावेळी सागर कोंडेकर, शिवानंद माळी, संभाजीराव भोकरे, एकनाथ देशमुख, प्रकाश कुंभार, राजाराम सांडुगडे, जयसिंग घाटगे, अशोक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

शक्तिपीठ रद्दचा खोटा जीआर दाखवून फसविले

समरजितसिंह घाटगे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा खोटा जीआर दाखवून पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांना फसविले. शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 17 ऑक्टोबरला एकोंडीत शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी कृती समितीचे नेते संजयबाबा घाटगे यांच्याकडे 15 ऑक्टोबर या तारखेचा शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा जीआर 21 ऑक्टोबरला दिला. ज्या दिवशी गाडी अडवली त्याच दिवशी याबाबत शेतकर्‍यांना का सांगितले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT