

वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी नामांकन दाखल झालाय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.
केज राखीव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या नमिता मुंदडा आणि नमिता अक्षय मुंदडा यांच्यासह सपना सुभाष सुरवसे आणि सतिश विठ्ठल वाघमारे या दोन अपक्षासह चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी दिली आहे.
आपल्या शिष्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उघडया जीपमध्ये उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंब्रा - कळव्यात शक्तिप्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुंब्रा - कळवा विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.
दक्षिण नागपूर सह विदर्भातील 42 -43 जागा काँग्रेस नक्कीच लढेल,शेवटी कुणी किती जागा घ्याव्या यापेक्षा मेरीटवर कोण जिंकेल हे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यामध्ये विदर्भाचा, पर्यायाने काँग्रेसचा मोठा वाटा असेल. विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, अभिजित पानसे उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज १४८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्या पत्नी नंदिनी राजन विचारे, केदार दिघे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केला.
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ दिवस सभा होणार आहेत. भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठीही पंतप्रधान मोदी सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान मोदींच्या सभांचा धडाका असणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "आम्ही काल ८५-८५-८५ फॉर्म्युला जाहीर केला आहे. आमच्या जागा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या जाहीर होतील."
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित आर.आर.पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार रोहित पवार, अनिता सगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तासगाव तालुकाध्यक्ष विश्वास पाटील आदी. उपस्थित होते.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे (Samrajitsingh Ghatge) तसेच त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत सकाळी पावणेअकरा वाजता त्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा रोड शो
महाविकास आघाडी आमच्यासमोर कोणतेही आव्हान उभे करेल, असे वाटत नाही. ज्या प्रकारे एकजुटीने निर्णय घेतले गेले त्यावर महायुतीमध्ये समाधान आहे. महाविकास आघाडीत अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण आम्हाला अशी कोणतीही समस्या नाही, अशी टीका भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील अर्ज भरण्यासाठी रवाना होत आहेत. तत्पुर्वी जयंत पाटील यांनी राजारामबापूंच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. दोन पक्षांची मोडतोड आणि आमदार पळवण्याची संस्कृती महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरू केली. महाराष्ट्रातील सुज्ञ जनता योग्य निर्णय घेईल. महाविकास आघाडीला राज्यात चांगलं वातावरण आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप संपूर्ण जागांवरील उमेदवार जाहीर झाले नसले, तरी आज (दि. २४) गुरुपुष्यामृत मुहूर्तावर अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. काही उमेदवार सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या निमित्ताने सहा पक्षांनी महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा अवकाश अक्षरशः व्यापला आहे. पाहा विधानसभा निवडणूक लाईव्ह अपडेट...