चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीतील साहित्याची उलथापालथ केली Pudhari
कोल्हापूर

Kagal Burglary | यमगे येथे घरफोडी; १३ लाखांच्या ऐवजासह ६० हजारांची रोकड लंपास

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा धाडसी डाव; परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Kagal Yamage Burglary

मुरगूड : कागल तालुक्यातील यमगे येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे १३ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धाडसी घरफोडीमुळे यमगेसह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यमगे येथील फुटवेअर व्यावसायिक महादेव दत्तात्रय लोकरे हे सोमवारी कुटुंबासह नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी पुणे येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. या संधीचा फायदा घेत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील लोखंडी तिजोरीतील साहित्याची उलथापालथ करत लॉकर उघडले आणि त्यामधील मौल्यवान दागिने व रोकड चोरून नेली. चोरी झालेल्या ऐवजात तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्यांची सोन्याची चेन, अडीच तोळ्यांचा लक्ष्मीहार, अर्धा तोळ्यांच्या दोन सोन्याच्या चेन, तसेच चांदीचे ताट, तांब्या, आरती, समई, ग्लास आदी वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय ६० हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. एकूण चोरीचा ऐवज अंदाजे १३ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर महादेव लोकरे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात चोरट्यांनी घराची पूर्वरेखी करून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुडले करीत आहेत.

दरम्यान, याच रात्री मुरगूड येथील बिद्री साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्या बंद निवासस्थानीही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती कोणताही ऐवज लागला नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT