Kagal Murgud Road Concretisation
सिद्धनेर्ली: कागल-निढोरी राज्य महामार्ग कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आले आहे. मुरगूडकडून शेंडूर फाट्यापर्यंतचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१२) बामणी (ता .कागल) हद्दीत नव्या टप्प्यातील कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी या कामाला जोरदार विरोध दर्शवत काम रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच कागलचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. रस्त्यासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची आधी योग्य नुकसान भरपाई द्या आणि मगच पुढील काम सुरू करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली.
"रस्ता विकासाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला आणि नुकसान भरपाई आधी दिली पाहिजे. मोबदला न देताच बळजबरीने काम सुरू करणे अन्यायकारक आहे. हक्काची भरपाई मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील," अशी आक्रमक भूमिका बामणी येथील बाधित शेतकऱ्यांनी मांडली.
काम सुरू करण्यावरून कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आणि उपस्थित शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तहसीलदार यांनी शासनाची भूमिका मांडत रस्त्याचे काम शांततेत पूर्ण करू देण्याचे आवाहन केले. परंतु, बाधित शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध झुगारून प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कॉंक्रिटीकरणाचे काम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
यावेळी प्रशासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि आंदोलनात आघाडीवर असलेल्या काही प्रमुख शेतकऱ्यांना तसेच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून बामणी हद्दीतील कॉंक्रिटीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. या घटनेमुळे बामणी आणि परिसरात शेतकरी व प्रशासनामधील संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.