Kagal Murgud Road Accident
सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील कागल ते मुरगुड जाणाऱ्या रोडवर आवटे पाटील मळ्याजवळ पिंपळगाव खुर्द येथे शुक्रवारी (दि.२६) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सारिका उत्तम संकपाळ (वय ४०, सध्या रा. जवाहरनगर, इचलकरंजी, मूळ रा. कसबा वाळवे) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम मारुती संकपाळ (वय ४८) हे आपल्या पत्नीसह दुचाकीने (क्र. MH-09-ES-1909) इचलकरंजीहून आपल्या मूळ गावी कसबा वाळवे येथे जात होते. सकाळी ९:३० ते ९:४५ च्या सुमारास पिंपळगाव खुर्द हद्दीत आले असता, पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. TN-69-BD-9732) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या धडकेत उत्तम संकपाळ हे जखमी झाले, तर पाठीमागे बसलेल्या सारिका संकपाळ या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कागल पोलिसांनी ट्रक चालक सबरी सन शक्तीवेल एस (रा. तामिळनाडू) याच्यावर भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वाळवे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. अधिक तपास कागल पोलीस आहेत.