Petrol, Diesel prices hiked Pudhari
कोल्हापूर

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करा; जयंतराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Petrol Diesel Price | वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून शासनाने तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

  1. जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले

  2. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची मागणी

  3. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा दावा

  4. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याची भावना व्यक्त

  5. कर हटवल्यास इंधनाचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात, असा दावा

ईश्वरपूर : राज्यातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट तसेच सरचार्ज तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री Jayant Patil यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून शासनाने तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

जयंतराव पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून महाराष्ट्रातील नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. आधीच महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

खाद्यतेल, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडत चालले आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून सर्वच वस्तू महाग होतात आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होतो, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांत सलग चौथ्यांदा इंधन दर वाढवण्यात आले आहेत. सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १११.१२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ९६.८६ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहेत.

जयंतराव पाटील यांनी राज्य सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या व्हॅट आणि सरचार्जचा विशेष उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्रात पेट्रोलवर सुमारे २५ टक्के व्हॅट आणि प्रति लिटर १०.१२ रुपये सरचार्ज आकारला जातो. तर डिझेलवर सुमारे २४ टक्के व्हॅट आणि प्रति लिटर ३ रुपये सरचार्ज आकारण्यात येतो. हे कर रद्द केल्यास इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

त्यांच्या मते, राज्य शासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घेतल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर ७० ते ८० रुपयांच्या दरम्यान येऊ शकतात. त्यामुळे महागाईच्या कठीण काळात सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकारने महसुलाचा विचार करण्यापेक्षा नागरिकांच्या आर्थिक अडचणींना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, वाढत्या इंधन दरांमुळे राज्यात पुन्हा एकदा महागाईचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधी पक्षांकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या कर धोरणांवर टीका केली जात असून सामान्य नागरिकांमध्येही इंधन दरवाढीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. आगामी काळात राज्य सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT