Ichalkaranji Crime Pudhari
कोल्हापूर

Ichalkaranji Crime: रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; सिटी स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर, नेमकं काय घडलं?

Ichalkaranji Shooting: इचलकरंजीजवळील कबनूर-रुई परिसरात रील बनवत असताना 19 वर्षीय निलेश कांबळे याच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ichalkaranji Shooting: सोशल मीडियासाठी व्हिडीओ आणि रील बनवण्याच्या नादात 19 वर्षीय तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीजवळील कबनूर-रुई परिसरात घडली. या घटनेत निलेश निशिकांत कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, निलेश हा व्हिडीओ शूट करत असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेनंतर सुरुवातीला तो उंचावरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांचीही काही काळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सिटी स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर

निलेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सिटी स्कॅन केला. या तपासणीत त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी असल्याचे आढळून आले. त्यानंतर हा केवळ अपघात नसून गोळीबाराची घटना असल्याचे स्पष्ट झाले. गोळी डोक्याच्या मागील बाजूने घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी शुभम दीपक सूर्यवंशी या संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा तपास केला जात आहे.

निलेश आणि शुभम यांच्यात नेमका काय संबंध होता, घटना घडली त्यावेळी तिथे कोण उपस्थित होतं आणि गोळी नेमकी कशा परिस्थितीत झाडली गेली, याचा तपास पोलीस करत आहेत.

रील बनवताना नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडिया रील तयार करताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा प्रकार अपघाती होता की निलेशवर जाणीवपूर्वक गोळी झाडण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

घटनेनंतर सुरुवातीला ‘उंचावरून पडल्यामुळे दुखापत झाली’ अशी माहिती देण्यात आली होती. सिटी स्कॅनमध्ये गोळी आढळल्यानंतर या घटनेमागील नेमके सत्य शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, पोलिसांकडून संशयिताची चौकशी तसेच घटनास्थळाची पाहणी केली आहे. रील शूट करताना नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, गोळी कोणी झाडली आणि या घटनेमागे अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT