BJP Corporator Nitesh Powar Arrested
इचलकरंजी : ऑनलाईन बेटींग प्रकरणात भाजपचे नगरसेवक गोट्या उर्फ नितेश पोवार यांचे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. रात्री उशिरा पोवार यास अटक करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 12 मधून प्रतिनिधीत्व करणारे नितेश पोवार हे राहुल आवाडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
या प्रकरणात आणखी काही बड्या राजकीय क्षेत्राशी संबंधित नावांची चर्चा सुरू असून पोलिसांच्या रडारवर अनेकजण आहेत. बेटींग प्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
आयपीएलच्या मुंबई-राजस्थान सामन्याच्या रणधुमाळीत चप्पलच्या गोदामातून बेटिंगचे रॅकेट सुरू असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला होता. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अमेय बडवे, अभिजीत बडवे, गणेश पाटील, उत्तमसिंग बग्गा, याकूब मुजावर, रिषभ पाटील हे सहा संशयित पोलिस कोठडीत आहेत.
आज दिवसभर त्यांची कसून चौकशी सुरू होती. प्रत्येकाकडे माहिती घेवून प्रकरणाचा उलगडा करण्यावर पोलिसांचा भर होता. बेटिंगचे रॅकेट मोठे असल्याची चर्चा होती. पोलिसांच्या तपासातून आज मोठे कनेक्शन उघड झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास गोपनियरित्या कारवाई करीत भाजपचे नगरसेवक नितेश पोवार यांना त्यांच्या राहत्या घरापासून ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
कारवाईचे वृत्त शहरात पसरताच अनेकांनी पोलिस ठाण्यासमोर तसेच न्यायालयासमोर मोठी गर्दी केली होती. बेटिंगच्या प्रकरणाचे नेटवर्क मोठे असल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी मोबाईल डेटा, बँक खात्याची माहिती यासह आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी सुरू केली आहे.