कोल्हापूर

इचलकरंजी: कुख्यात जर्मनी टोळीवर पाचव्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई

अविनाश सुतार

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीवर आज (दि.७) पाचव्यांदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. कबनुर येथील स्क्रॅप व्यावसायिकाकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जर्मनी टोळीच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मने, प्रवीण उर्फ कन्नड पव्या मल्लाप्पा मगदूम, शुभम सदाशिव पट्टणकुडे, शिवा नारायण शिंगे, अमोल सुनिल लोले अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांवर मोक्काअंतर्गत कारवाई कारवाई करण्यात आली आहे. अमोल लोले हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे.

इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी गँगवर यापूर्वी ४ वेळा मोक्काअंतर्गत कारवाई झाली आहे. या टोळीचा म्‍हाेरक्‍या अविनाश जाधव आणि आदर्श जाधव या दाेघांचे सहकारी तुरूंगाची हवा खात आहेत. २६ जून रोजी टोळीतील आनंदा जाधव, प्रवीण मगदूम, शुभम पट्टणकुडे, शिवा शिंगे आणि अमोल लोले यांनी स्क्रॅप व्यावसायिक रफिक नरंदेकर याच्याकडे १ लाखाची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या टोळीचा पूर्वेतिहास पाहता पुन्हा ही टोळी सक्रीय झाल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सागर चौगुले तसेच अन्य सहकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला. पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने या टोळीवर आता पाचव्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपास उपअधीक्षक बाबुराव महामुनी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT